कमी पाझर असलेल्या जमिनीत बांधा शेततळे

राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा

कमी पाझर असलेल्या जमिनीत बांधा शेततळे

बहुतांश शेतकऱ्यांनी पीक काढणी पूर्ण केली आहे. संरक्षित सिंचनासाठी शेततळ्यांचा होणारा फायदा लक्षात घेता त्यांनी येत्या काळात शेततळे निर्मिती करण्याकडे लक्ष द्यावे. ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जागा शोधून तेथे शेततळ्याची निर्मिती करावी.

- डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. सुधीर दहिवाळकर

शेततळे म्हणजे काय? त्याचे विविध प्रकार इत्यादी तांत्रिक बाबींची माहिती घेतल्यास शेतकऱ्याला त्याच्या सोयीनुसार पाणी साठविता येते. त्याबाबत माहिती घेऊ.
शेततळे व साठवणूक तळे म्हणजे काय?
- शेतजमिनीवरून पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी खोदलेल्या तळ्यास शेततळे असे म्हणतात. नाला, ओघळीचे काठावरील पडीक क्षेत्रात शेततळे घेतात. शेततळ्यात पावसाचे पाणी साठण्यासाठी शेततळ्याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्राची आवश्यकता असते.
- कमी क्षेत्र असलेले किंवा बागायतदार शेतकरी इतर ठिकाणांहून पाणी आणून शेतात तळे करून साठवितात, त्याला साठवणूक तळे असे म्हणतात.
शेततळ्याचे फायदे :
- आपत्कालीन स्थितीत पिकास सिंचन करता येते.
- पूरक सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
- पाणलोट क्षेत्रातील भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते.
- चिबड व पाणथळ जमीन सुधारणेसाठी उपयोग होतो.
- मत्स्यसंवर्धन, दुग्धोत्पादन यासारखे जोडधंदे करता येतात. 
- पिकांवरील विविध प्रकारच्या फवारण्यांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते.
शेततळ्याचे प्रकार :
शेततळ्याचे मुख्यत्वे तीन प्रकार आहेत.
- नैसर्गिक घळ अथवा ओघळ अडवून केलेले शेततळे
- सपाट जमिनीतील शेततळे - सपाट जमिनीतील शेततळे हे अर्धे खोदलेले व अर्धे बांधलेले किंवा पूर्ण खोदलेले असते.
- साठवणूक तलाव- जो पूर्णपणे जमिनीवर बांधला असतो किंवा अर्धा खोदला व अर्धा बांधलेला असतो.
शेततळ्यासाठी जागेची निवड :
- पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी असलेली जमीन शेततळ्यासाठी निवडावी.
- चिकणमातीचे अधिक प्रमाण असलेली काळी जमीन शेततळ्यास योग्य आहे.
- पश्चिम घाटात भात शेतीसाठी जमिनीच्या वरील थरातील लॅटराईट जमिनीतसुद्धा शेततळे घेणे फायद्याचे असते.
- मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक किंवा खारवट अशी जमीन शेततळ्यासाठी निवडू नये.
शेततळ्याचे आकारमान :
शेततळ्याच्या पाणलोट क्षेत्रावर पडणारे पावसाचे पाणी पावसाच्या अपधावामुळे शेतात येते. पावसाच्या अपधावेमुळे येणारे सर्व पाणी साठविण्याइतपत शेततळ्याचा आकार असावा.
अपधाव काढणे :
घनमीटर या एककात अपधाव काढण्यासाठी खालील सूत्राचा वापर करावा.
एकूण अपधाव = क x प x अ
-------------
१०
क = सरासरी पावसापासून उपलब्ध होणारा अपेक्षित अपधाव (टक्के)
प = वार्षिक सरासरी पर्जन्यमान (मि. मी.)
अ = पाणलोटाचे एकूण क्षेत्र (हेक्टर)
वार्षिक सरासरी पावसावर उपलब्ध होणारा अपधाव (क) हा भारी जमिनीत ८ ते १० टक्के, तांबड्या जमिनीत २० टक्के आणि मध्यम भारी जमिनीत १० ते १५ टक्के इतका धरावा. 
उदा. जर शेततळ्याचे पाणलोट क्षेत्र ५ हेक्टर असेल म्हणजेच ‘‘अ’’, वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६०० मि.मी. असेल म्हणजेच ‘‘प’’ व जमिनीचा प्रकार मध्यम भारी असेल तर अपेक्षित अपधाव म्हणजेच ‘‘क’’ १० असेल. अशावेळी ५ गुणिले ६०० गुणिले १० म्हणजे ३०,००० भागीले १० म्हणजे ३००० घनमीटर (३० लाख लिटर) पाणी अपधावाद्वारे मिळू शकते.
आकारमान निश्चित करण्याची पद्धत
प्रथम तांत्रिक निकषाप्रमाणे शेततळ्याची जागा निश्चित करावी.
चाचणी खड्डे घेऊन शेततळ्याची खोली निश्चित करावी.
शेततळ्यात ज्या क्षेत्रातून पाणी येणार आहे ते पाणलोट क्षेत्र निश्चित करून (अ) मोजावे.
तालुक्याच्या वार्षिक सरासरी पर्जन्यमानाची (प) खात्री करावी.
पाणलोटातील जमिनीचा प्रकार निश्चित करावा. त्या प्रकारानुसारच अपेक्षित अपधाव (क) निश्चित करावा.
पाणलोट क्षेत्र, अपेक्षित अपधाव आणि वार्षिक पर्जन्यमान निश्चित केल्यानंतर वरील सूत्राप्रमाणे अपधाव (आर) काढावा.
एकूण अपधावाच्या ५० ते १०० टक्के पाणीसाठा होण्यासाठी आवश्यक असलेल्या शेततळ्याचे आकारमान निश्चित करावे.
नैसर्गिक परिस्थितीतही कमीत कमी मातीकाम करून जास्तीत जास्त पाणी साठविता येईल, अशापद्धतीने शेततळ्याचे अाकारमान निश्‍चित करावे. शेततळ्याची सर्वसाधारण खोली २ ते ३ मीटर असेल. शेततळ्याचा आतील उतार जमिनीच्या मगदुरानुसार १ः१ किंवा १.५ : १ ठेवावा.
शेततळ्याचा आकार पाणलोट क्षेत्रानुसार व त्यातून उपलब्ध होणाऱ्या अपधावेतून होणाऱ्या पाणीसाठ्याच्या अनुषंगाने असा असावा.

अधिक माहितीकरिता संपर्क -
डॉ. सुधीर दहिवाळकर, ९७६३६५११९५
(जलसिंचन व्यवस्थापन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी)

(जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी.) 
पिक सिंचन पाणी गरज, पाणी व्यवस्थापन, पाणी संवर्धन, इत्यादी शेती क्षेत्रातील पाणी निगडीत शास्त्रीय माहितीकरिता आजच 'राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा' हे फेसबूकवरील लाईक करा...

खालील लिंकवर जाऊन आपले फेसबुक पेज लाईक करा...
https://www.facebook.com/iwrasrkvy/

खालील लिंकवर जाऊन आपल्या ब्लॉगला भेट द्या...
http://rkvyiwras.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

असे करा विहीर, कूपनलिका पुनर्भरण

शेततळ्यातून सायफन पद्धतीने द्या पिकांना पाणी