सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी...

राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा

माती पाणी संबंध - 
मातीच्या प्रकारानुसार मातीची जलधारणक्षमता, निचरा, मातीतील पाण्याची हालचाल, पिकांकडून पाण्याचे शोषण इ. बाबी बदलत जातात. मातीच्या कणांच्या रचनेवर मातीतील पाण्याची हालचाल अवलंबून असते.
- हलक्‍या जमिनीतील मातीच्या कणांचा आकार मोठा असून, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असते.
- मध्यम प्रकारच्या जमिनीत वाळू व पोयट्याच्या प्रमाणापेक्षा चिकण मातीच्या कणांचे प्रमाण कमी असते. या जमिनीत बऱ्यापैकी पाण्याचा निचरा होतो व हवा खेळती राहते.
- भारी जमिनीत वाळूपेक्षा पोयटा व चिकण कणांचे प्रमाण जास्त असते. अशा जमिनी पाणी धरून ठेवत असल्या तरी हवा खेळती राहण्याचे प्रमाण कमी असते. - जमिनीचा रंग, जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन, मातीची सच्छिद्रता, मातीतील सेंद्रिय कर्बांचे प्रमाण याचा पाणी व्यवस्थापन करताना विचार करावा लागतो.

पीक-पाणी संबंध -
पिकाने केशाकर्शण दाबाने मुळाद्वारे शोषलेल्या पाण्यापैकी एक-दोन टक्के पाण्याचा वापर पीक स्वतःच्या चयापचय क्रियेसाठी करते. उरलेले पाणी पर्णछिद्रांद्वारे वातावरणात सोडून दिले जाते. पिकांच्या अन्न शोषणामध्ये, वाहनामध्ये, प्रकाशसंश्‍लेषण क्रियेत तसेच शरीराचे तापमान संतुलित राखण्यामध्ये पाण्याची भूमिका खूपच महत्त्वाची असते.
- सर्वसाधारणपणे पिकांपासून एक किलो शुष्क पदार्थ तयार होण्यासाठी त्या पिकास 900 ते 1000 लिटर पाण्याची आवश्‍यकता असते.
- पिकांची पाण्याची गरज ही पिकांचा कालावधी, पीकवाढीची अवस्था मुळांची खोली, पिकांच्या पानाची रचना व एकूण पानाचे क्षेत्रफळ या बाबींवर अवलंबून असते. पिकांच्या सुरवातीच्या काळात पाण्याची गरज ही खूपच कमी असते व ती हळूहळू वाढत जाऊन पीक फुलोऱ्यात असताना सर्वांत जास्त होते. पुढे पीक तोडणीच्या अवस्थेकडे जाताना पाण्याची गरज कमी होत जाते.

राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा

हवामान-पाणी संबंध -
- जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन तसेच पानातून होणारे पाण्याचे उत्सर्जन यांचा हवामानातील तापमान, वाऱ्याचा वेग, आर्द्रता व पर्जन्य इ. घटकांचा अगदी जवळचा संबंध असतो.
- जास्त तापमानात जमिनीतून व पिकांच्या पानातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन व उत्सर्जन होते. हवेत आर्द्रतेचे प्रमाण कमी असेल तरी सुद्धा बाष्पीभवनाचा व पर्णोत्सर्जनाचा वेग वाढतो. वाऱ्याचा वेग जास्त असल्यास बाष्पीभवनाचा व पर्णोत्सर्जनाचा वेग वाढतो.
- पिकांसाठी पाण्याचे नियोजन करताना हवामानातील घटकांचा बारकाव्याने अभ्यास करावा लागतो.
- पावसाच्या पाण्यापैकी जमिनीच्या उतारामुळे काही पाणी वाहून जाते तर काही पाणी निचऱ्यावाटे खोलवर निघून जाते. यासाठी पडणाऱ्या एकूण पावसापैकी पिकांसाठी उपयुक्त पाऊस किती हे ठरवून पिकांचे पाणी व्यवस्थापन करावे लागते.

पाणी व्यवस्थापनात नेहमी वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या संज्ञा -
- बाष्पपर्णोत्सर्जन - जमिनीच्या पृष्ठभागावरून पाण्याचे होणारे बाष्पीभवन व पिकांच्या पानांतून पाण्याचे होणार उत्सर्जन या दोन्ही एकत्रितरीत्या बाष्पपर्णोत्सर्जन असे म्हणतात. पिकाची पाण्याची गरज ही जवळपास बाष्पपर्णोत्सर्जनाएवढी, किंबहुना त्यापेक्षा जास्त असू शकते.
- पीक गुणांक - पीक गुणांक हा पिकाची वाढ, पिकावर असलेल्या एकूण पानांचे क्षेत्रफळ तसेच पिकाच्या वाढीसाठी लागणारे जमिनीचे एकूण क्षेत्रफळ यावर अवलंबून असतो. पिकांचा पीक गुणांक माहीत असेल तर त्या पिकासाठीचे बाष्पपर्णोत्सर्जन काढता येते व त्यावरून पिकास किती पाणी द्यावयाचे हे ठरविता येते. काही अपवादात्मक पिके वगळता महाराष्ट्राच्या हवामानात बहुतांशी पिकांचा गुणांक एक पेक्षा कमी असतो.
- सिंचन आराखडा - पिकांना पाणी केव्हा व किती द्यायचे यास सिंचन आराखडा असे म्हटले जाते. कमीत कमी पाण्यात अधिक पीक उत्पादन घेण्याकरिता सिंचन आराखडा महत्त्वाचा आहे. पीक पेरणीच्या प्रारंभी सिंचन आराखडा ठरवताना हंगाम, पिकाचा प्रकार, जमिनीचा प्रकार, पर्जन्यमान इ. बाबी पाहाव्या लागतात. पिकांद्वारे पाण्याचा पुरेपूर वापर होईल, जमिनीवरून पाणी वाहून जाणार नाही तसेच ते जमिनीत खोलवर मुरणार नाही, याकडे लक्ष पुरवावे लागते. पाण्याची उपलब्धता कमी असल्यास पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पिकांना पाणी देणे गरजेचे ठरते. सिंचन आराखडा तयार करताना सिंचन पद्धतीच्या कार्यक्षमतेचा विचार करणे आवश्‍यक ठरते.

सिंचन पद्धतींची कार्यक्षमता -
- प्रवाही सिंचन पद्धतीची कार्यक्षमता अतिशय कमी असून दिलेल्या पाण्यापैकी फक्त 40 ते 60 टक्के पाणी पीकवाढीसाठी उपयुक्त ठरते. म्हणून प्रवाही सिंचन पद्धतीची कार्यक्षमता ही 40 ते 60 टक्‍क्‍यांच्या दरम्यान असते.
- तुषार सिंचन पद्धतीची कार्यक्षमता ही 75 ते 80 टक्‍क्‍यांपर्यंत असते.
- ठिबक सिंचन पद्धतीची कार्यक्षमता ही 90 टक्‍क्‍यांपर्यंत असते.

पिक सिंचन पाणी गरज, पाणी व्यवस्थापन, पाणी संवर्धन, इत्यादी शेती क्षेत्रातील पाणी निगडीत शास्त्रीय माहितीकरिता आजच 'राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा' हे फेसबूकवरील लाईक करा...
 आपण आपल्या ब्लॉगला भेट देऊनही सविस्तर लेख मिळवू शकता...

खालील लिंकवर जाऊन आपले फेसबुक पेज लाईक करा...
https://www.facebook.com/iwrasrkvy/

खालील लिंकवर जाऊन आपल्या ब्लॉगला भेट द्या...
http://rkvyiwras.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

असे करा विहीर, कूपनलिका पुनर्भरण

शेततळ्यातून सायफन पद्धतीने द्या पिकांना पाणी

कमी पाझर असलेल्या जमिनीत बांधा शेततळे