फळबागेसाठी ठिबक सिंचनाचे नियोजन

राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा

$$$ फळबागेसाठी ठिबक सिंचनाचे नियोजन $$$

फळपिकाची पाण्याची गरज ही पिकाचा प्रकार, पिकाच्या वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, हवामान यावर अवलंबून असते. पिकास गरजेप्रमाणे पाणी द्यावे. कमी पाणी दिल्यास पिकावर पाण्याचा ताण बसून उत्पादनात घट होऊ शकते. हे लक्षात घेऊन ठिबक सिंचनाचे नियोजन करावे. 
डॉ. सुनील गोरंटीवार 

ठिबक सिंचन पद्धतीद्वारे ५० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होऊन १० ते २५ टक्के उत्पादनात वाढ होते. २५ टक्क्यांपर्यंत खताच्या वापरात बचत होते. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब शास्त्रीय पद्धतीने करणे आवश्यक आहे व त्यासाठी खाली नमूद केलेले प्रमुख मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. 

तोट्यांचा प्रवाह - 
१) तोट्यांचा प्रवाह निश्चित करण्यासाठी विविध बाबी लक्षात घ्यावयाच्या असतात. तोट्यांचा प्रवाह हा जमिनीत पाणी आत जाण्याच्या वेगापेक्षा कमी असावा की जेणेकरून तोट्यांमधून जमिनीवर पाणी पडल्यावर ते साठविले जाऊ नये. जमिनीवर जर पाणी साठविले गेले तर पाण्याचे बाष्पीभवन होऊन तसेच जमिनीला उतार असल्यास ते वाहून वाया जाते. जमिनीवर पाणी जास्त काळ साचून राहिल्यास सूक्ष्म वातावरणावर परिणाम होऊन रोगराईचा प्रादुर्भाव होण्याचा संभव असतो. 
२) भारी जमिनीचा पाणी मुरण्याचा वेग कमी असतो, त्यामुळे अशा जमिनीसाठी कमी प्रवाहाच्या तोट्या वापराव्यात. हलक्या जमिनीचा पाणी मुरण्याचा वेग जास्त असतो. त्यामुळे अशा जमिनीसाठी जास्त प्रवाहाच्या तोट्या वापरल्या तरी चालतात, पण हलक्या जमिनीतसुद्धा तोट्यांचा प्रवाह हा फार जास्त असू नये. कारण जास्त प्रवाह असल्यास हलक्या जमिनीत पाणी हे सरळ खाली जाऊन जमिनीत अपेक्षित ओलावा निर्माण होत नाही. 
३) तोट्यांमधून प्रवाह हा अतिशय कमी पण असू नये, कारण अशा तोट्यांच्या छिद्राचा व्यास कमी असतो व ते लवकर बुजण्याची शक्यता असते किंवा यासाठी अतिशय प्रभावी गाळण यंत्रणेची आवश्यकता असते. तसेच अतिशय कमी प्रवाह असल्यास संच चालवायचा कालावधी वाढतो व विजेचे उपलब्ध तास कमी असल्यास संच पूर्ण क्षेत्रासाठी चालविणे अडचणीचे ठरू शकते. या सर्व गोष्टींचा विचार करून तोट्या निवडताना साधारणतः त्याचा प्रवाह २ ते ४ लिटर प्रति तास एवढा असावा. 
४) बाजारात उपलब्ध असणाऱ्या अशा तोट्यांसाठी साधारणतः १० मीटर (१.० किलोग्रॅम/सेमी) एवढा दाब लागतो. 

तोट्यांची संख्या - 
१) फळझाडांना एकापेक्षा अनेक तोट्या लागू शकतात. तोट्यांची संख्या साधारणतः एवढी असली पाहिजे की त्याद्वारे झाडाच्या मुळांचे संपूर्ण क्षेत्र हे ओले व्हावे. तोट्यांची संख्या ही कार्यक्षम मुळांनी व्यापलेले क्षेत्र भागिले एका तोटीने ओले होणारे क्षेत्र याप्रमाणे काढता येते.
२) भारी जमिनीत एका तोटीने ओले होणारे क्षेत्र हे जास्त असल्याने त्या जमिनीत तोट्यांची संख्या कमी असावी. हलक्या जमिनीत एका तोटीने ओले होणारे क्षेत्र हे कमी असल्याने त्या जमिनीत तोट्यांची संख्या जास्त असावी. 
३) महत्त्वाच्या पिकासाठी संपूर्ण वाढ झालेल्या फळझाडांसाठी लागणारी तोट्यांची संख्या जमिनीच्या प्रकारामुळे खालीलप्रमाणे आहे. 
डाळिंब - ३ ते ६ 
लिंबू/संत्रा - ४ ते ८ 
आंबा/चिकू/नारळ - ६ ते १५ 

राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा


दोन तोट्यांमधील अंतर - 
१) ओळीमध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांना (जसे- केळी, द्राक्ष किंवा जास्त घनतेच्या फळपिकांसाठी) ठिबक सिंचन प्रणालीने पाणी देताना त्या ओळीचा संपूर्ण पट्टा ओला झाला पाहिजे याप्रमाणे द्यावे लागते. 
२) पिकांच्या ओळीचा संपूर्ण पट्टा ओला होण्यासाठी दोन तोट्यांमधील अंतर किती ठेवावे हे महत्त्वाचे आहे. दोन तोट्यांमधील अंतर हे जमिनीच्या प्रकारावर अवलंबून आहे. 
३) भारी जमिनीत एका तोटीने जास्त क्षेत्र ओले होत असल्याने दोन तोट्यांमधील अंतर जास्त असते. त्याचप्रमाणे हलक्या जमिनीत हे कमी असते. विविध प्रकारच्या जमिनीत दोन तोट्यांमधील अंतर किती असावे. यासंबंधाची ढोबळ मानाने माहिती खाली दिली आहे.
१. भारी जमीन = ७५ सें.मी. (२.५ फूट) २. मध्यम जमीन = ६० सें.मी. (२ फूट) 
२. हलकी जमीन = ४५ सें.मी. (१.५ फूट) ४. अत्यंत हलकी जमीन = ३० सें.मी. (१ फूट). 

उपनळ्यांची लांबी व व्यास - 
१) पाण्याची अधिकतम बचत करण्यासाठी जमिनीचा चढ-उतार व उपनळीचा प्रवाह यानुसार उपनळीची लांबी व व्यास अपेक्षित कार्यक्षमता (९० ते ९५ टक्के) मिळू शकेल एवढी असावी. त्यासाठी उपनळ्याची लांबी व व्यास निश्चित करणे आवश्यक आहे. 
२) उपनळ्या किंवा ठिबक सिंचन प्रणालीच्या कुठल्याही नळ्यांचा व्यास निश्चित करण्याची प्रक्रिया ही क्लिष्ट आहे. 
३) बाजारामध्ये साधारणतः १२ मि.मी. व १६ मि.मी. व्यासाच्या उपनळ्या उपलब्ध आहेत. ढोबळमानाने १२ मि.मी. व्यासाची उपनळी जर वापरली तर उपनळीची लांबी ३० मीटरपेक्षा जास्त असू नये. तसेच १६ मि.मी. व्यासाची उपनळी वापरली तर त्याची लांबी ५० मीटरपेक्षा जास्त असू नये. जर २० मी.मी. व्यासाच्या उपनळ्या उपलब्ध झाल्यास त्याची लांबी १०० मीटरपर्यंत असू शकते. 
४) उपनळ्यांची लांबी व व्यास हे जमिनीच्या चढउ-तारावर तसेच उपनळ्यांच्या प्रवाहावरसुद्धा अवलंबून असते. जर जमिनीला चढ-उतार असेल तर चढावाच्या दिशेने उपनळीची लांबी कमी (१-३ टक्के चढ-उतारासाठी ४५ टक्के व ३-५ टक्क्यासाठी ४० टक्के) तर उताराच्या दिशेने लांबी जास्त (१-३ टक्के चढ-उतारासाठी ५५ टक्के व ३-५ टक्क्यांसाठी ५५ टक्के) असावी. यापेक्षा जास्त चढ-उतारासाठी उपनळ्या चढ-उतारावर आडव्या म्हणजे समपातळीत असाव्यात. 

ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याचे वेळापत्रक ठरविणे - 
१) ठिबक सिंचन पद्धतीचे योग्य आरेखन व आराखडा तयार झाल्यावर व त्याप्रमाणे प्रत्यक्ष शेतात ठिबक सिंचन प्रणाली बसविल्यानंतरचे महत्त्वाचे कार्य म्हणजे ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पिकांस गरजेप्रमाणे पाणी व खत देणे. 
२) पिकाची पाण्याची गरज ही पिकाचा प्रकार, पिकाच्या वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, हवामान यावर अवलंबून असते. पिकास गरजेप्रमाणे पाणी देणे आवश्यक आहे. कमी पाणी दिल्यास पिकावर पाण्याचा ताण बसून उत्पादनात घट होऊ शकते, तर जास्त पाणी दिल्यास पाण्याचा अपव्यय होईल. 
३) पिकाची पाण्याची गरज काढण्याची पद्धत जास्त अंतराच्या फळझाडांसाठी (म्हणजे जेव्हा दोन झाडांमधील व झाडाच्या दोन ओळीमधील अंतर जास्त असते. उदा. डाळिंब, लिंबू, आंबा इ.) आणि ओळीमध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांसाठी (जेव्हा दोन रोपांमधील व रोपांच्या दोन ओळींमधील अंतर कमी असते. उदा. द्राक्ष, केळी किंवा उच्च घनतेचे फळपीक इ.) वेगळी आहे. 
४) जास्त अंतराच्या फळझाडांसाठी मुळांच्या कार्यक्षम क्षेत्रामध्ये अपेक्षित ओलावा ठेवण्यासाठी एका झाडाला ठिबक संचाने द्यावयाचे पाणी काढावे. त्यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार एका झाडाला लागणाऱ्या तोट्यांची संख्या निश्चित करावी व नंतर संच चालविण्याचा कालावधी काढावा. 
५) ओळीमध्ये घेण्यात येणाऱ्या फळपिकांसाठी दोन झाडांमधील अंतर कमी असल्याने संपूर्ण ओळीचा विशिष्ट रुंदीचा पट्टा ओला ठेवावा लागतो. असा संपूर्ण पट्टा ओला ठेवावा लागण्यासाठी जमिनीच्या प्रकाराप्रमाणे दोन तोट्यांमधील अंतर किती असावे हे ठरवावे लागते. त्यानंतर पिकाच्या पाण्याच्या गरजेप्रमाणे एका तोटीतून द्यावे लागणारे पाणी काढावे. यानंतर संच चालविण्याचा कालावधी ठरवावा. थोडक्यात, फळझाडांसाठी एका झाडाला पाणी देण्यासाठी कार्यक्षम मुळाचे संपूर्ण क्षेत्र ओले ठेवण्यासाठी तोट्यांची संख्या काढावी लागते, तर ओळीमध्ये घेण्यात येणाऱ्या फळपिकांसाठी ओळीचा संपूर्ण पट्टा ओला ठेवण्यासाठी दोन तोट्यांमधील अंतर काढावे लागते. 

संपर्क - 
(प्रमुख, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, 
डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) 

पिक सिंचन पाणी गरज, पाणी व्यवस्थापन, पाणी संवर्धन, इत्यादी शेती क्षेत्रातील पाणी निगडीत शास्त्रीय माहितीकरिता आजच 'राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा' हे फेसबूकवरील लाईक करा...
आपण आपल्या ब्लॉगला भेट देऊनही सविस्तर लेख मिळवू शकता...

खालील लिंकवर जाऊन आपले फेसबुक पेज लाईक करा...
https://www.facebook.com/iwrasrkvy/

खालील लिंकवर जाऊन आपल्या ब्लॉगला भेट द्या...
http://rkvyiwras.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

असे करा विहीर, कूपनलिका पुनर्भरण

शेततळ्यातून सायफन पद्धतीने द्या पिकांना पाणी

कमी पाझर असलेल्या जमिनीत बांधा शेततळे