पिकासाठी वापर योग्य रंग, गुणधर्माचे प्लॅस्टिक मल्चिंग

राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा

**** पिकासाठी वापर योग्य रंग, गुणधर्माचे प्लॅस्टिक मल्चिंग ****

अलीकडे विविध पिकांमध्ये प्लॅस्टिक मल्चिंग करण्याचे प्रमाण वाढत आहे. याचे रंग, गुणधर्मानुसार विविध प्रकार असून, योग्य कारणासाठी योग्य प्लॅस्टिकचा वापर केल्यास पिकांसाठी फायदा होतो.

डॉ. सुनील गोरंटीवार






 

पिकातील खते व पाण्याचा ऱ्हास रोखण्यासाठी प्रामुख्याने आच्छादनाचा वापर केला जातो. त्यामध्ये सेंद्रिय आणि प्लॅस्टिक असे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.

प्लॅस्टिक आच्छादनाचे प्रकार -
पीक आणि फळबाग लागवडीमध्ये आच्छादनासाठी पीव्हीसी, एलडीपीई या प्रकारच्या प्लॅस्टिक फिल्मचा उपयोग करता येतो. अलीकडे अतिशय पातळ व छेदन प्रतिकारकशक्ती असल्याने एलडीपीईपेक्षा एलएलडीपीई प्लॅस्टिक फिल्मला प्राधान्य दिले जाते. त्याचे रंग व गुणधर्मानुसार काही प्रकार पडतात.

- पारदर्शक प्लॅस्टिकचे आच्छादन -
पारदर्शक आच्छादनामुळे सूर्याची किरणे जमिनीपर्यंत जाऊ शकतात. मात्र, जमिनीपासून परावर्तित होणारी ऊर्जा ही आच्छादनामुळे अडविली जाते. परिणामी जमिनीचे तापमान वाढण्यास मदत होते. याची एक अडचण म्हणजे सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहाेचू शकल्यामुळे या आच्छादनाखाली तणे वाढू शकतात.

- काळ्या प्लॅस्टिकचे आच्छादन -
काळ्या रंगाच्या आच्छादनामुळे सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहाेचत नाहीत. जमिनीचे तापमान वाढत नाही. त्याचप्रमाणे सूर्यकिरणे नसल्यामुळे तणांचा उपद्रव कमी होतो.

- सूर्यकिरणे परावर्तित करणारे आच्छादन -
ही विशेषतः पांढऱ्या किंवा चंदेरी रंगाची असतात. त्यामुळे सूर्यकिरणे परावर्तित होऊन पिकाला खालील बाजूनेही प्रकाश उपलब्ध होतो. पिकाची वाढ जोमदार होते. तसेच मावा आणि तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. या किडी विषाणूजन्य रोगांच्या प्रसारक असल्याने त्यांच्याही प्रसाराला आळा बसतो.

- इन्फ्रारेड प्रकाशास पारदर्शी आच्छादन -
आच्छादनातून सूर्य प्रकाशातील इन्फ्रारेड किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत असली तरी तणांच्या वाढीस उपयुक्त अशी प्रकाश किरणे पोहाेचत नाहीत. त्यामुळे तणांची वाढ रोखली जाते. अशा आच्छादनाखाली जमिनीचे तापमान काळ्या प्लॅस्टिकच्या आच्छादनापेक्षा जास्त असते. परिणामी अशा आच्छादनामुळे पीक ७ ते १० दिवस अगोदर तयार होते. या प्रकारच्या आच्छादनाचा रंग हिरवट किंवा विटकरी असतो.

- पिकानुसार वापरावयाचे आच्छादन
निरनिराळ्या पिकांसाठी निरनिराळ्या रंगाचे आच्छादन उपलब्ध होत आहे. त्यांचा वापर केल्यास पिकांच्या उत्पादनात १० टक्केपर्यंत वाढ होऊ शकते. आच्छादनाच्या पृष्ठभागावरून झाडांवर परावर्तित होणारा प्रकाश हा उत्पादनवाढीस कारणीभूत ठरतो. उदा. टोमॅटो पिकासाठी तांबड्या रंगाचे आच्छादन हे अन्य आच्छादनापेक्षा जास्त प्रभावशाली ठरते, तर बटाट्यासाठी फिकट निळे किंवा पांढरे आच्छादन जास्त फायदेशीर ठरते.

रंगीत प्लॅस्टिक आच्छादने -
अ) पिवळा - काळा - पिकावरील विशिष्ट किडींना आकर्षित करत असल्याने त्यांच्यामुळे पसरणाऱ्या विषाणूजन्य रोगांचा प्रसार रोखला जातो.
ब) पांढरा - काळा - जमीन थंड ठेवतात
क) चंदेरी - काळा - जमीन थंड ठेवण्यास मदत होते. काही फिल्म मावा, फुलकिडींना पिकापासून दूर ठेवतात.
ड) लाल-काळा - यामुळे काही प्रमाणात प्रकाश आत जाऊन जमीन तापते. तसेच काही प्रकाश आच्छादनावरून परावर्तित होऊन, खालील बाजूने झाडे व रोपांच्या पानांवर पडतो. परिणामी झाडांना पाने फुटणे, फुले येणे व प्रकाश संश्‍लेषण यावर चांगला परिणाम होऊन झाडाला लवकर फळधारणा होते. उत्पादनात वाढ होते. परदेशामध्ये झालेल्या संशोधनात टोमॅटोचे उत्पादन लाल प्लॅस्टिक आच्छादनाने, तर वांगे पिकाचे उत्पादन निळ्या प्लॅस्टिक आच्छादनाने वाढल्याचे आढळले आहे.

विणलेले सच्छिद्र आच्छादन - या आच्छादनातून हवा, पाणी तसेच खते जमिनीपर्यंत जाऊ शकतात. मात्र, ते तणांच्या वाढीला रोखू शकते. त्याचप्रमाणे गादी वाफ्यावर वापरण्यायोग्य हे आच्छादन स्ट्रॉबेरीसारख्या वर्षानुवर्षे टिकणाऱ्या पिकांसाठी फायदेशीर ठरते. आच्छादन वारंवार गुंडाळणे व टाकणे यांचा खर्च वाचतो.
प्लॅस्टिक आच्छादन वापरण्याची पद्धत
- प्रथम जमिनीचे सपाटीकरण, ठिबक सिंचनाची मांडणी इ. करून घ्यावे.
- वारा शांत असताना योग्य ताण देऊन घड्या राहणार नाहीत अशा पद्धतीने प्लॅस्टिक फिल्म अंथरावी. बाजूने ४ ते ६ इंच जाडीचा मातीचा थर टाकून हवाबंद करून घ्यावी. त्यामुळे प्लॅस्टिक स्थिर राहते.
- प्लॅस्टिक आच्छादनाला पीक व लागवडीच्या अंतरानुसार छिद्रे पाडावीत. त्यात थेट बियाणे पेरता येते किंवा रोप ही लावता येते.

आच्छादनाच्या वापरण्यातील मर्यादा -
- आच्छादन अंथरणे व काढणे खर्चिक - दरवर्षी दरवर्षी प्लॅस्टिकचे आच्छादन शेतातून काढावे लागते. कारण त्यांचे विघटन होत नसल्याने शेतीमध्ये तसेच राहते. त्यामुळे काढणे व अंथरण्याचा खर्च वाढतो.
- प्लॅस्टिक आच्छादनाचा सुरवातीचा खर्च जास्त आहे.
- सतत देखभाल आवश्‍यक असून, फाटलेल्या किंवा सरकलेल्या आच्छादनाची त्वरित दुरुस्ती न केल्यास संपूर्ण आच्छादन फाटत जाऊ शकते.
- पीक आणि तण यांच्यात स्पर्धा ः काही प्रकारच्या प्लॅस्टिक आच्छादनात (पारदर्शक) सूर्यप्रकाश पोचल्यामुळे तण वाढते. पिकांची तणाशी स्पर्धा होते. काळ्या प्लॅस्टिकमध्ये आच्छादनाखाली तण वाढत नसले तरी झाडांसाठी आच्छादनाला पाडलेल्या छिद्रामध्ये तण वाढते. त्याची काढणी वेळच्या वेळी करावी लागते.

प्रायोगिक निष्कर्ष व शिफारशी -
- काळ्या प्लॅस्टिकमुळे पिकानुसार १२ ते १४ टक्के उत्पादनात वाढ होते. पाण्याची सुमारे २० टक्के बचत होते.
- काळ्या प्लॅस्टिक आच्छादनामुळे ऊस व मिरची या पिकांची उगवण ४ ते ६ दिवस लवकर होते.
- देशात अन्य ठिकाणी झालेल्या संशोधनातही प्लॅस्टिक आच्छादनामुळे पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये ५ ते ५८ टक्के उत्पादनात वाढ झाली, तर ठिबक सिंचन पद्धतीत वेगवेगळ्या पिकांच्या उत्पादनात ५ ते ८० टक्के लक्षणीय वाढ मिळत असल्याचे आढळले आहे.

इ) जैविक आच्छादन -
- पूर्वीच्या पिकाचे उर्वरित अंश (उदा. उसाचे पाचट, सोयाबीन काड, भाताचे तूस, पालापाचोळा, गव्हाचे काड इ.) आच्छादनासाठी वापरता येतात. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंसाठी पोषक वातावरण व अन्न मिळाल्याने त्यांची वाढ होते.
१) उसाचे पाचट हेक्टरी पाच टन प्रमाणात तुकडे करून पसरून टाकावे.
२) फळबागेमध्ये दुपारी झाडाची सावली जमिनीवर जिथेपर्यंत पडते, तिथपर्यंतच्या जमिनीवर आच्छादन करावे. सेंद्रिय आच्छादनामध्ये वाळवी किंवा अन्य किडी वाढू नयेत, यासाठी शिफारशीनुसार दाणेदार कीटकनाशक टाकावे.
जैविक आच्छादनाचे फायदे -
- जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता वाढते.
- जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी राहतो. जमीन वाफशावर राहते.
- सेंद्रिय घटक कुजल्यानंतर त्यातून पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता होते.
- जमिनीचे तापमान कमी राहिल्याने सूक्ष्मजीवांची संख्या वाढते.
- शेत तणविरहीत राहून खुरपणी खर्चात बचत होते.
- दोन पाणी पाळ्यातील अंतर वाढून पाण्याची बचत करता येते.

डॉ. सुनील गोरंटीवार, ०२४२६-२४३२६८

(जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी.)
पिक सिंचन पाणी गरज, पाणी व्यवस्थापन, पाणी संवर्धन, इत्यादी शेती क्षेत्रातील पाणी निगडीत शास्त्रीय माहितीकरिता आजच 'राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा' हे फेसबूकवरील लाईक करा...

खालील लिंकवर जाऊन आपले फेसबुक पेज लाईक करा...
https://www.facebook.com/iwrasrkvy/

खालील लिंकवर जाऊन आपल्या ब्लॉगला भेट द्या...
http://rkvyiwras.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

असे करा विहीर, कूपनलिका पुनर्भरण

शेततळ्यातून सायफन पद्धतीने द्या पिकांना पाणी

कमी पाझर असलेल्या जमिनीत बांधा शेततळे